फडणवीसांनी शपथविधीचा घटनाक्रम सांगितला तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाहीत


रत्नागिरीः पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी जोरदार प्रहार केला आहे. आपल्याला अजित पवार टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असे म्हणत अजित पवारांवर त्यांनी रत्नागिरीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना हल्लाबोल केला आहे.

आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, शरद पवार साहेबांसोबत त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून उभे केले जाते, आज भाजपवर तोच माणूस टीका करतो आणि आपण सहन का करायची, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

त्याचबरोबर धनंजय मुंडेंचे नाव न घेता निलेश राणेंनी त्यांना लक्ष्य केले. प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत आहेत का, असा टोला मुंडेंना निलेश राणेंनी लगावला. शपथविधीच्या पहाटे काय घडले ते फणडवीस अजून सांगत नाहीत, त्यांनी जर तो घटनाक्रम सांगितला तर बारामतीतसुद्धा अजित पवार फिरू शकणार नसल्याचे सांगत निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर सुद्धा निशाना साधला. सर्वोच्च न्यायालयामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव घेतले, मग आम्ही बोलायचे नाही का, खून तुम्ही करा, नाईट किंग तुम्ही आहात ना मग रात्री मर्डर करा, यांना काय लायन्ससची गरज आहे का?, सुशांत सिंग प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज कुठे गेले, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला.

कोरोना काळातील मुंबईच्या महापालिकेच्या ठेक्यावरून माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भाजप नेते आशिष शेलारांनी सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भात विषय मांडला. पण फिल्म इंडस्ट्रीमधील हौसे गौशांना सॅनिटायझर आणि मास्क बनवण्याचा ठेका हा दिला गेला.

शिवसेनेच्या खासदारांनी काल दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. निलेश राणेंनी यावरूनसुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलकांना भेटायला संजय राऊत गेले, मात्र कधी मराठा समाज्याच्या आंदोलकांना भेट दिली का? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. माजी खासदार निलेश राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले. सिंधुदुर्गातील प्रजासत्ताक दिनी आंदोलकांच्या भेटीला न जाता दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटल्यावरून निलेश राणेंनी विनायक राऊत यांनी चिमटे काढले.