राज्य सरकार युवा शक्तीला देश सेवेकडे वळविण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल – उद्धव ठाकरे


मुंबई : देशाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणे हे साधारण व्यक्तीचे कार्य नसून त्यासाठी देशसेवेची जिद्द आणि हिंमत लागते. अशा युवाशक्तीला देशसेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. आता उपविजेतेपदावरच न थांबता पुढल्या काळात महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन आणि दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळविल्याबद्दल राज्याच्या एनसीसी पथकातील विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकाऱ्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित अभिनंदन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशसेवा आणि सैन्यात येणाऱ्या युवकांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान मोलाचे आहे. जिद्दीने आणि हिंमतीने देशहिताचे कार्य करणाऱ्या युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जे जे पाहिजे ते रक्षण देण्यात येईल. आपल्या देशाची कामगिरी इतर देशांपेक्षा अव्वल असली पाहिजे असे कार्य करा. यशस्वी वाटचाल करत रहा. अडचणी आल्यास सरकार नेहमी पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

मुलांना देशकार्यात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही आभार मुख्यमंत्र्यांनी यावेळी मानले. यावेळी ब्रिगेडिअर सुनिल लिमये, मेजर जनरल वाय पी खंडोरी, ब्रिगेडिअर एस लहरी, कर्नल प्रशांत नायर आणि चमूत असलेल्या विद्यार्थी, अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.