‘व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त ताज हॉटेलने कोणतीही ऑफर दिलेली नाही, व्हायरल मसेजेवर स्पष्टीकरण


प्रेमी युगलांचा दिवस म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाइन्स डे आता अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण हा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशे सोशल मीडियामध्येही यानिमित्ताने विविध मेसेज व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईतील ख्यातनाम ताज हॉटेलबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॅलेंटाइन्स डे निमित्त ताज हॉटेल एक गिफ्ट कार्ड पाठवत असून त्याद्वारे 7 दिवस मोफत राहता येणार आहे, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज एवढा व्हायरल झाला आहे की त्यावर आता स्वतः ताज हॉटेलने स्पष्टीकरण दिले आहे.

मला TAJ हॉटेलकडून एक गिफ्ट कार्ड मिळाले आणि अखेर TAJ हॉटेलमध्ये 7 दिवसांपर्यंत मोफत राहण्याची संधी मिळाली, असे व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. या मेसेजसोबत एक लिंक देखील देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यास अजून एक मेसेज येतो. त्यात, TAJ EXPERIENCES GIFT CARD TAJ हॉटेलने व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी 200 गिफ्ट कार्ड पाठवले आहेत. या कार्डचा वापर तुम्ही TAJ च्या कोणत्याही हॉटेलमध्ये 7 दिवस मोफत राहण्यासाठी करु शकतात. तुमच्याकडे तीन प्रयत्न आहेत. गुड लक! असा संदेश देण्यात आला आहे.

OK वर जर कोणी क्लिक केल्यास प्रश्नोत्तराच्या एका पेजवर तुम्ही पोहोचतात. जेंडर, हॉटेलचे दर याबाबत काही प्रश्न या पेजवर विचारले जातात. त्याचे तुम्ही उत्तर दिल्यास अजून एक पेज ओपन होते, त्यावर TATA चा लोगो असलेले 12 बॉक्स असतात. कोणत्याही बॉक्सवर क्लिक करुन गिफ्ट कार्ड जिंकले आहे की नाही हे बघायचे असते. गिफ्ट कार्ड जर कोणी जिंकले तर कार्ड मिळवण्यासाठी पुढच्या पेजवर जाण्यास सांगितले जाते. नंतर हा मेसेज पाच ग्रुपमध्ये किंवा 20 जणांना पाठवण्यास सांगितला जातो.

या व्हायरल मेसेजवर ताज हॉटेलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या लक्षात आले आहे की, एक वेबसाइट व्हॉट्सअपद्वारे व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त ताज एक्सपीरिअन्स गिफ्ट कार्डच्या ऑफरबाबत प्रचार करत आहे. पण ताज हॉटेल्स/ आयएचसीएलने अशी कोणतीाही ऑफर आणलेली नसल्यामुळे अशाप्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना मुंबई पोलिसांनीही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त सोशल मीडियावर गिफ्ट कार्ड किंवा कूपनचे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये, असे आवाहन पोलिसांनी सोमवारी केले आहे.