नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्यामुळे केंद्र सरकारवरर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. कोणताही दिलासा अर्थसंकल्पात देखील देण्यात आला नाही. यावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहेच. पण आता रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर असे म्हणत, भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
पेट्रोलच्या वाढत्या दरावरुन भाजप खासदाराचा पक्षाला घरचा आहेर
— Subramanian Swamy (@Swamy39) February 2, 2021
वाढत्या इंधन दरावर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अनोख्या शैलीमध्ये हे ट्विट केले आहे. त्यांनी एक भावनिक मुद्दा पुढे करत आपल्याच सरकारला हा टोला लगावला आहे. रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये 53 लिटर दर आणि रावनाच्या लंकेमध्ये पेट्रोलचे दर 51 रुपये लिटर असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
आपल्या स्पष्टोयोक्तीसाठी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे ओळखले जातात. यावेळी ते आपलेच सरकार आहे याचा विचार न करताच स्पष्ट मत व्यक्त करतात. यामुळे अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाला अडचणी येतात. यापूर्वीही त्यांनी आयटी भाजपच्या आयटी सेलवरुन आपल्या पक्षावर टीका केली होती. यासोबतच राम मंदिराच्या मुद्यावरून सुद्धा स्वामी यांनी पक्षावर टीका केली होती.