अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल


मुंबई – पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या आहेत. अमृता फडणवीस विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियात चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कधी गाण्यामुळे तर कधी त्यांच्या राजकीय टोलेबाजीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, यातच आता अर्थसंकल्पावर अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल केले जात आहे.


सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले, तसेच निर्मला सीतारामन यांचे कौतुक करताना मागील १०० वर्षात कधीही पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अमृता फडणवीस यांनीही निर्मला सीतारामन यांचे आभार मानले, तर सर्वसामान्यांवर कराचा बोजा न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची, हे सर्व देश आपल्याकडून शिकत असल्याचे अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.


या प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस यांना सोशल मीडियात चांगलेच ट्रोल करण्यात आले, स्वातंत्र्याला १५० वर्ष तरी पूर्ण झाली आहेत का? देशाला ७३ वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलत असल्याचे म्हणत नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली. तर एका युजरने सांगितले की, स्वतंत्र हिंदुस्तानाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला गेला, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्ष झाल्याचे सांगितले.