खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर खून, विनयभंगाचा गुन्हा दाखल


पुणे : खुनाचा प्रयत्न तसेच विनयभंगाचा गुन्हा खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाण प्रकरणात आता न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या 37 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, मजय चड्डा, मनीष आनंद, मोटारसायकलवर असलेले दोन अनोळखी व्यक्ती आणि गर्दीत असणारा एक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, औंध येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे 14 डिसेंबर रोजी कार पार्क केली होती. त्यावेळी त्यांनी कारचा दरवाजा उघडला असता पाठीमागून जाणूनबुजून ममता चड्डा आणि वजय चड्डा यांनी धडक देऊन आरडाओरडा केला. त्यांना शिवीगाळ करत फिर्यादी यांना स्पर्श करत विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी हा प्रकार झाल्यानंतर तेथून त्यांचे सहकारी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत औंध चौकात आले असता, त्यांची कार आरोपींनी दुचाकी आडवी लावून थांबवली. तसेच जाधव यांना खाली ओडून मारहाण करत शिवीगाळ केली. रॉडने त्यांना बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे.

तर आरोपींनी या गोंधळात घेऊन फिर्यादी यांना कारमध्ये बसवले तसेच आरोपी मनीष आनंद आणि अमन आणि करण यांनी त्यांच्यावर गाडीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना मारहाण करून त्यांचा आयफोन तोडला. कारचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम हर्षवर्धन जाधव आणि फिर्यादी यांच्यावर जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी त्यावेळी तक्रार केली होती.

पण पोलिसांनी त्यात कारवाई केली नाही. यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्यानुसार पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. यामध्ये खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.