म्यानमारच्या लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याला अमेरिकेचा विरोध


वॉशिंग्टन – अमेरिकेने म्यानमारमध्ये जबरदस्तीने सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला इशारा दिला आहे. अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांना सोडून द्या, असे सांगितले आहे. अन्यथा वॉशिंग्टनकडून प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही दिला आहे. लष्कर आणि नागरी सरकारमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या मुद्यावरुन निर्माण झालेला तणाव वाढत गेला, अखेर आंग सान सू की आणि देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यात आली.

अमेरिकेचा नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालात कोणताही बदल करणे किंवा म्यानमारच्या लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याला विरोध असून सत्ता ताब्यात घेण्याचे पाऊल मागे घेतले नाही, तर जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असा इशारा व्हाइट हाऊसमधील प्रवक्त्या जेन साकी यांनी दिला. आम्ही लष्कर आणि सर्व संबंधित पक्षांना लोकशाही नियमांचे पालन करण्याची आणि ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका करण्याची विनंती करतो, असे जेन साकी म्हणाल्या.

निवडणुकीत आंग सान सू की यांच्या एनएलडी पक्षाने सहज विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत घोटाळा झाल्याच्या मुद्यावरुन तणाव निर्माण झाला होता. मागच्याच आठवडयात लष्कराने सत्ता ताब्यात घेण्याचे संकेत दिले होते. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत.