संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोकरी, व्यवसायासाठी आलेल्या व्यक्तींना मिळणार कुटुंबीयांसह नागरिकत्व


दुबई – भारतीयांसह इतर देशांच्या नागरिकांसाठी संयुक्त अरब अमिराती सरकारने (यूएई) मोठा निर्णय जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) डॉक्टर, इंजिनीअर आदी विशेषज्ञांसह अन्य काही विदेशी नागरिकांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल कोरोना दरम्यान अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी उचलण्यात आले आहे.

याबाबतची घोषणा दुबईचे प्रशासक व देशाचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख महंमद बिन अल मख्तूम यांनी केली. शेख महंमद म्हणाले, नागरिकत्वाकरिता कलाकार, लेखक, डॉक्टर, इंजिनीअर आणि शास्त्रज्ञ त्यांच्यासह कुटुंबीयांसाठी अर्ज करू शकतात. यूएईचे नागरिक बनल्यानंतरही ते आपले जुने नागरिकत्व कायम ठेवू शकतात. यापूर्वी यूएईने 1971मध्ये देशात सरकार स्थापनेसाठी मदत करणाऱ्या पॅलेस्टिनी व इतरांना नागरिकत्व दिले होते. त्यानंतर कालांतराने इतरांनाही नागरिकत्व दिले जात आहे.

यूएईची नागरिकत्व मिळणाऱ्या परदेशी नागरिकांनादेखील मूळ नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार का, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. परदेशातील नागरिकांना आतापर्यंत फक्त नोकरी, कामानिमित्त व्हिसा दिला जात होता. या व्हिसाची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण करण्यात येत होते. व्हिसा नियमांमध्ये मागील काही काळात शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे काही खास गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना अधिक वेळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्य करता येऊ शकते.