यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायजर पाजल्याने 12 मुले रुग्णालयात दाखल


यवतमाळ : काही महिन्यापूर्वीच भंडारा जिल्हा प्रशासन रुग्णालयात घडलेली अग्निकांडाची घटना ताजी असतानाच राज्यात पुन्हा एकदा चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली असून पाच वर्षांखालील चिमुरड्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी घडला. पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 12 लहान बालकांना दाखल करण्यात आले आहे. मुलांना सुरुवातीला उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.