मिठाचा करा असाही वापर

salt
मिठाचा वापर केवळ भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी नाही, तर घरातील अनेक कामांकरिता केला जाऊ शकतो. प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरामध्ये शंभर टक्के सापडणारा हा पदार्थ आणखी कोणकोणत्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो हे जाणून घेऊ या. अनेकदा स्वयंपाक करताना भाजी, पुलाव, दुध यांसारखे पदार्थ करपतात आणि भांड्याच्या तळाला लागतात. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी ती खूप घासावी लागतात. पण भांड्याच्या तळाला लागलेला पदार्थ विना मेहनत पटकन निघून यावा आणि भांडे देखील खराब होऊ नये या करिता मिठाचा वापर करावा. जे भांडे करपले आहे, त्यामध्ये पाणी भरून घेऊन त्यामध्ये एक वाटी मीठ घालून या पाण्याला सात ते आठ मिनिटे चांगली उकळी आणावी. पाणी चांगले उकळले, की गॅस बंद करावा. हे पाणी ओतून द्यावे. या पाण्याबरोबर भांड्याच्या तळाला लागलेला पदार्थ सहज सुटून येईल आणि भांडेही स्वच्छ होईल. त्यानंतर भांडे नेहमीप्रमाणे साबणाने धुवून घ्यावे.
salt1
कपड्यांना इस्त्री करताना अनेकदा इस्त्रीला कपडा चिकटून जळतो, आणि त्याचे डाग इस्त्रीवर राहतात. इतर कपड्यांना इस्त्री करताना हे डाग त्या कपड्यांवर येऊन ते कपडे खराब होण्याची शक्यता असते. इस्त्रीच्या तळावर पडलेले डाग हटविण्यासाठी एक मोठा बटर पेपर घ्यावा. या पेपरवर मीठ पसरून ठेवावे. इस्त्री चांगली गरम करून घेऊन या मिठावरुन फिरवावी. यामुळे इस्त्रीच्या तळावरील डाग निघून येऊन इस्त्री स्वच्छ होईल.
salt2
अनेकदा स्वयंपाक करताना कांदे, लसूण, मासे अश्या वस्तू कापल्यामुळे हातांना उग्र वास येऊ लागतो. अनेकदा साबणाने हात धुवून देखील हा वास हातांमधून जात नाही. अश्या वेळी हातांवर थोडे मीठ घालून घेऊन ते हातांवर चांगले चोळावे, व त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. मिठाचा वापर केल्याने हातांना येत असलेला उग्र वास नाहीसा होण्यास मदत होईल. तसेच स्वयंपाक करीत असताना एखादी ओलसर वस्तू तेलामध्ये परतण्यास टाकताना तेल एकदम उडण्याचा धोका संभवतो. अश्या वेळी पदार्थ तेलामध्ये टाकण्यापूर्वी चिमुटभर मीठ तेलामध्ये टाकून मग पदार्थ तेलामध्ये टाकल्यास तेल एकदम तडतडून उडणार नाही.

Leave a Comment