स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेमध्ये बोलणे कशामुळे घडून येते?

sleep
आपण स्वतः किंवा आपल्या घरातील कोणी तरी गाढ झोपेत असताना देखील काही तरी बोलत असल्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काही वेळा हे बोलणे असंबद्ध, समजणार नाही असे असते, तर काही वेळा झोपेत बोलणारी व्यक्ती अगदी स्पष्ट बोलत असते. पण मुळात एखादी व्यक्ती झोपेत कशासाठी बोलते, हे जाणून घेऊ या. झोपेत बोलण्याला साध्या भाषेमध्ये स्लीप टॉकिंग, आणि वैद्यकीय भाषेमध्ये ‘सॉम्निलोकी’ किंवा ‘पॅरासोम्निया’चा एक प्रकार म्हणून संबोधले जाते. पॅरासोम्निया हा झोपेशी निगडित विकार असून, यामध्ये एखादी व्यक्ती झोपेत असताना हातापायांना झटके येणे, झोपेत बोलणे, चित्रविचित्र स्वप्न पडणे अश्या प्रकारच्या समस्या उद्भवितात.
sleep1
स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेत बोलण्याच्या क्रिया, व्यक्ती झोपेत गाढ असताना कधीही घडत असतात. झोपेत बोलण्याची क्रिया सामान्यपणे तीस सेकंदांच्या काळापेक्षा अधिक वेळ चालत नाही. या वेळामध्ये व्यक्तीचे शब्दोच्चार कधी स्पष्ट असतात, तर कधी शब्द अस्पष्ट, असंबद्ध असतात. एखादी व्यक्ती झोपेत बोलू लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मानसिक तणाव, नैराश्य, अपुरी, अशांत झोप, जास्त प्रमाणात केलेले मद्यपान, आजारामध्ये आलेला तीव्र ताप, किंवा एखाद्या औषधाच्या परिणामस्वरूप देखील व्यक्ती झोपेमध्ये बोलू लागते. काही तज्ञांच्या मते झोपेत बोलण्याची सवय आनुवांशिक असू शकते, तर अनेकदा झोपेशी निगडित इतर विकारांच्या जोडीने व्यक्तीचे झोपेत बोलणे सुरु होऊ शकते. ‘स्लीप किंवा नाईट टेरर’ या विकारामध्ये व्यक्ती झोपेमध्ये अचानक मोठमोठ्याने किंचाळू लागते, क्वचित आसपासच्या वस्तूंची मोडतोडही करू शकते.
sleep2
एखादी व्यक्ती जर वारंवार झोपेमध्ये बोलू लागली, तर त्यामध्ये विशेष काळजी करण्यासारखे काही नसून, बहुतेकवेळी औषधोपचारांची गरज भासत नाही. पण झोपेत बोलण्यामुळे जर सतत झोपमोड होऊ लागली, किंवा झोपेमध्ये बोलण्यासोबतच इतर तक्रारी सुरु झाल्या, तर मात्र तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. विशेषतः व्यक्ती जर झोपेत असताना हातापायांची जोरजोराने हालचाल करीत असेल, मोठमोठ्याने किंचाळत असेल, किंवा झोपेत सतत भीतीदायक स्वप्ने पडून त्यामुळे व्यक्ती झोपेमध्ये मोठ्मोठ्याने बोलत असले, तर या मागे मानसिक तणाव, किंवा नैराश्य असू शकते. अश्या वेळी काऊंसेलरचा सल्ला विशेष उपयोगी ठरू शकतो.

Leave a Comment