जुने शिपिंग कंटेनर्स ‘री-डिझाइन’ करून गरजूंना परवडतील अश्या तात्पुरत्या घरांचे निर्माण

container
‘QED सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंटस् लिमिटेड’ या कंपनीने जुने शिपिंग कंटेनर्स ‘री-फर्बिश’ करून, म्हणजेच गरजेनुसार त्यांमध्ये नुतनीकरण करून गरजू लोकांना परवडतील अशी तात्पुरती घरे उभी केली आहेत. हा प्रकल्प या कंपनीच्या मार्फत लंडनमध्ये उभारला गेला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठकाणी सहज हलविता येतील अशी तात्पुरती घरे, शिपिंग कंटेनर्सचा वापर करून बनविण्यामध्ये QED कंपनीचा हातखंडा असून, अश्या प्रकारचे अनेक प्रकल्प त्यांच्या मार्फत या पूर्वीही उभारले गेले आहेत.
container1
हे शिपिंग कंटेनर्स ‘री-फर्बिश’ करुन गरजेनुसार घरांचे निर्माण करण्यासाठी यांचा वापर करण्यात येतो. अश्या प्रकारची तात्पुरती घरे उभारण्यासाठी जुन्या शिपिंग कंटेनर्सचा वापर करण्याचा पर्याय अलीकडच्या काळातील सर्वोत्तम पर्याय म्हणून निवडला जात आहे. हे शिपिंग कंटेनर्स अतिशय दणकट आणि टिकाऊ असून, किंमतीने स्वस्तही आहेत. त्यामुळे त्यांचे नुतनीकरण करून ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे घरे बांधणे शक्य होऊ शकते.
container2
अश्याप्रकारची तात्पुरती, पण सहज परवडण्यासारखी घरे उपलब्ध झाल्यामुळे, इतरत्र कायमस्वरूपी सोय होईपर्यंत येथे वास्तव्य करता येणे शक्य असल्यामुळे गरजू परिवारांसाठी ही घरे वरदान ठरत आहेत. QED कंपनीच्या मार्फत उभारलेला हा प्रकल्प चौतीस अपार्टमेंटस् असणारा असून, ही सर्व घरे सर्व सोयींनी युक्त, म्हणजेच संपूर्णपणे ‘फर्निश्ड’ आहेत. वन-रूम स्टुडियो अपार्टमेंट पासून दोन बेडरूम अपार्टमेंट पर्यंत सर्वच पर्याय या प्रकल्पामध्ये उपलब्ध असल्याने गरजू लोकांना आपापल्या पसंतीप्रमाणे आणि गरजेनुसार घरे निवडण्याची मुभा मिळते. त्याचबरोबर ही घरे अतिशय माफक किंमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
container3
या घरांचा प्रकल्प उभारण्यास चौदा आठवड्यांचा कालावधी लागला असून, हा प्रकल्प एका जुन्या पार्किंग प्लेसमध्ये उभारण्यात आला आहे. या घरांच्या आसपास भरपूर मोकळी जागा उपलब्ध असून, त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा लोकांना फिरण्यासाठी आणि मनोरंजनासाठी मुबलक जागाही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment