रिझर्व्ह बँकेने रद्द केला महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना


कोल्हापूर : इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीसुद्धा शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

पुरेसे भांडवल शिवम सहकारी बँकेकडे नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे. 29 जानेवारी 2021पासून आर्थिक व्यवहार किंवा कोणतेही बँकिंग व्यवहार बँकेला करता येणार नाहीत. शिवम सहकारी बँकेचे नुकसानीचे आकडेसुद्धा आरबीआयने दिले आहेत.

इश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांची रक्कम आहे. बँक बंद झाली असली तरी लिक्विडेशननंतर बँकेत पैसे जमा असलेल्या खातेदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे. ज्यांनी बँकेत 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, त्यांचा याचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्रातील रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीला आरबीआयने निर्देश दिले आहेत की, बँकेला बँद करण्याचे निर्देश जारी करावेत. बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने बँक चालू न ठेवणे म्हणजे पैसे जमा करणाऱ्या खातेदारांवर अन्याय होईल. बँक सध्या आपल्या खातेदारांना त्यांची सर्व रक्कम परत करण्यास असमर्थ आहे. बँकेला व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यास लोकांना आणखी नुकसान सहन करावे लागू शकते. शिवम सहकारी बँकेचे लिक्विडेशन सुरू झाल्यानंतर खातेदारांचे पैसे परत केले जाणार आहेत.