डासांना पळविण्यासाठी करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

Dengue
सध्या पावसाळा संपला असला तरी डासांचा प्रादुर्भाव कायम आहे. डासांना पळविण्यासाठी अनेक तऱ्हेचे स्प्रे, कॉइल्स, रीपेलंटस् बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण यांमधील रसायनांच्या उग्र वासाने, किंवा यांच्या धुराने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, किंवा अन्य अॅलर्जी उद्भवू शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी रासायनिक स्प्रे किंवा कॉइल्सच्या ऐवजी पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापुराचा उपयोग डास पळविण्यासाठी करता येऊ शकतो. हा उपाय संपूर्णपणे सुरक्षित असून, यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
Dengue1
संध्याकाळच्या वेळी दारे खिडक्या उघड्या राहिल्या तर डासांच्या जोडीने इतरही लहान लहान किडे घरामध्ये शिरकाव करतात. त्यामुळे खिडक्यांवर जाळी असणे उत्तम. प्रत्येक खोलीमध्ये कापूर जाळून त्याचा धूर सर्वत्र पसरून द्यावा. आवश्यकता वाटल्यास खोलीचे दार बाहेरून काही मिनिटे बंद करून ठेवावे. यामुळे खोलीतील डास नाहीसे होतील. कापुराप्रमाणेच कडूनिंबाच्या पानांचा धूर केल्यानेही डास पळविता येतात. जर घराबाहेर पडायचे असले, तर थोड्या खोबरेल तेलामध्ये कडूनिंबाच्या पानांचा रस मिसळून ते तेल हातापायांना लावावे. त्यामुळे डास जवळपास फिरकत नाहीत. लहान मुलांकरिता हा उपाय सुरक्षित असून, या तेलाचा प्रभाव आठ तासांपर्यंत राहतो. लिंबाच्या तेलामध्ये निलगिरीचे तेल मिसळून अंगाला लावल्यानेही डास चावत नाहीत.
Dengue2
घराच्या आसपास तुळशीची रोपे लावल्यास त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच लिंबाची झाडे किंवा झेंडूची रोपे घराच्या आसपास असल्यानेही डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. लसणीच्या थोड्या पाकळ्या वाटून घेऊन हे वाटण पाण्यामध्ये मिसळावे आणि हे पाणी घरामध्ये स्प्रे केले असता, त्याच्या वासाने डास नाहीसे होतात. त्याचप्रमाणे लॅव्हेंडरच्या वासाचा रूम फ्रेशनर घरामध्ये फवारल्याने देखील घरातून डास नाहीसे होतात.

Leave a Comment