Myntra बदलला लोगो; नेटकरी गोंधळले


मुंबई : आपल्या लोगोबाबत एक नवा आणि मोठा निर्णय ई- कॉमर्स साईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिंत्रा (Myntra) या शॉपिंग वेबसाईटने घेतला. हा निर्णय यामुळे मोठा ठरला कारण एका नव्या रुपानेच मिंत्रा सर्वांसमोर येणार होते. हा लोगो महिलांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असल्याचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये या लोगोसंदर्भातील एक तक्रार एका महिलेने दाखल केली होती. ज्यामुळेच मिंत्राकडून कंपनीचा लोगो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोशल मीडियावर मिंत्राकडून नवा लोगो लाँच करताच याबाबतच्या असंख्य चर्चांनी जोर धरला. मिंत्राचा लोगो बदलला असता तरीही प्रथमदर्शनी नेमके काय बदलले आहे, असाच प्रश्न अनेकांपुढे उभा राहतो. पण, लोगो निरखून पाहिल्यास यामध्ये रंगतसंगतीत काही बदल केल्याचे लक्षात येत आहे. हा फारसा मोठा बदल नसल्यामुळे नेटकऱ्यांनी हीच बाब हेरत मिंत्राच्या नव्या लोगोबाबत काही विनोदी मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर मीम्स शेअर करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यातच मिंत्राच्या लोगोच्या निमित्ताने या मंडळींना आयता विषयच मिळाला. या लोकप्रिय ई- कॉमर्स साईटची ज्या धर्तीवर जोरदार खिल्ली उडवण्यात आली. नेमके काय बिघडले होते, लोगो की लोकांची विचार करण्याची क्षमता? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.