त्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय

skin
त्वचेला खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची अॅलर्जी झाल्याने, कोणत्या जंगली झाडांना हात लागल्याने, किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने किंवा त्वचेचा एखादा विकार उद्भविल्याने त्वचेला खाज सुटू शकते. त्वचेला खाज सुटण्याबरोबरच त्वचेवर फोड येणे, बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे अश्याही समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी किंवा यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आजमावता येतील. पण हे उपाय सर्वसाधारण कारणांच्या मुळे त्वचेवर खाज सुटली असता अवलंबिण्याचे असून, एखाद्या त्वचा रोगामुळे किंवा तत्सम काही कारणांनी खाज सुटत असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
skin1
त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर अतिशय प्राचीन काळापासून होत आला आहे. हे तेल लावल्याने खाज कमी होतेच, शिवाय त्वचेची आग होत असेल तर ती वेदनाही त्वरित शमते. हे तेल गरम न करता तेसेच हाताच्या बोटांनी चोळून लावावे, आणि त्यानंतर त्वरित स्नान करणे टाळावे. बेकिंग सोडा, किंवा खाण्याचा सोडा हा पदार्थ सर्वांच्याच घरी असतोच. जर त्वचेला खाज सुटून पुरळ आले, तर बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट लावल्याने खाज आणि पुरळ दोन्ही कमी होते. याशिवाय आंघोळीच्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून त्याने स्नान केल्यासही खाज कमी होण्यास मदत होते.
skin2
ओटमील हा पदार्थ नाश्ता म्हणून अतिशय उत्तम तर आहेच, पण ओटमीलची पावडर त्वचेला लावल्याने त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते. या मध्ये अँटीइन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने खाज कमी होऊन पुरळ आले असल्यास ते ही कमी होते. चेहऱ्यावर लावण्यासाठी हा उपाय सुरक्षित आहे. हा उपाय करण्यासाठी ओटमीलच्या एक कप पावडरमध्ये पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर अर्धा तास लाऊन ठेऊन मग कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.
skin3
तुळशीची पानेही त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पाच ते सहा तुळशीची पाने ठेचून घेऊन खोबरेल तेलामध्ये मिसळावीत आणि हे तेल खाज सुटलेल्या ठिकाणी लावावे. हे तेल त्वचेवर किमान अर्धा तास राहू देऊन त्यानंतर धुवून टाकावे. ज्यांना त्वचेला खाज सुटण्याची समस्या वारंवार सतावत असेल, त्यांनी हा उपाय आठवड्यातून किमान तीन दिवस करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment