३०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या ‘रामायण’मध्ये झळकणार ऋतिक-दीपिका


कलाविश्वात मागील काही काळापासून ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘बाजीराव-मस्तानी’, ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच ‘रामायण’ या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना करणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त या चित्रपटाचे बजेट असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात ‘स्पॉट बॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, कलाविश्वात आणि सोशल मीडियावर सध्या मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘रामायण’ हा थ्रीडी चित्रपट असून याचे बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिका पादुकोण ‘रामायण’ या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. तर हृतिक रोशन प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दीपिका आणि हृतिक ही जोडी ‘रामायण’पूर्वी ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा अलिकडेच करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे.