‘डिजिटल डीटॉक्स’आजच्या प्रगत काळामध्ये याची आवश्यकता

detox
आजच्या ‘डिजिटल’ काळामध्ये लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सर्वांच्याच हातांमध्ये मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, टॅबलेट्स दिसत आहेत. इंटरनेट आणि सोशल मिडिया ही आजच्या पिढीची जीवनरेखा बनून राहिली आहे. या सर्व डिजिटल माधामांचा वापर आता केवळ सोयीपुरता राहिला नसून आता तो आपल्या दैनंदिन सवयीचा अविभाज्य भाग होऊन राहिला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे आपले दैनंदिन जीवनही हळू हळू डिजिटल माध्यमांच्या आहारी जात आहे. यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक विकारही उद्भवू लागले आहेत. यांचा अतिवापर करण्याचे दुष्परिणाम डोळ्यांवर आणि मानेच्या सांध्यांवर ‘सर्व्हायकल स्पॉन्डीलोसीस’ च्या रूपाने पहावयास मिळू लागले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी विशिष्ट पदार्थांचे आणि पाण्याचे सेवन करून डीटॉक्स करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल डीटॉक्स’ करून काही काळाकरिता या डिजिटल माध्यमांपासून दूर राहणे अगत्याचे झाले आहे.
detox1
हातातील फोन्स, किंवा समोर असलेल्या लॅपटॉप पासून आपल्याला सवड मिळत नसल्याने घराबाहेर पडून व्यायाम करण्यासाठी आपल्याला वेळ मिळेनासा झाला आहे. व्यायामासाठी बाहेर पडलेच, तरी हेडफोन्स आणि त्यामधून ऐकू येणारे संगीत आपल्या सोबतीला असतेच, किंवा व्यायाम करीत असताना अनेकदा फोनवर कोणाशी तरी संभाषणही सुरु असते. डिजिटल माध्यमांचा आंनद घेताना आपण सातत्याने एका जागी बसून राहत असल्याने शरीराची हालचाल व्हायला हवी तितकी होत नाही, आणि परिणामी लठ्ठपणा, मानदुखी, पाठदुखी, डोळे लाल होणे, त्यांची आग होणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. हे सर्व दुष्परिणाम टाळण्याकरिता डिजिटल माध्यमांचा योग्य आणि ठराविक वेळेकरिता केला जाणारा वापर हा नवा नियम आपण घालून घ्यायला हवा.
detox2
ज्या व्यक्तींना सतत कॉम्प्युटरसमोर बसूनच काम करावे लागते, त्यांनी काही ठराविक वेळेनंतर दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा. या वेळामध्ये ऑफिसमध्ये किंवा घरातल्या घरात पायी चालावे. त्यामुळे पायांमधील रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी आपले मोबाईल फोन्स, टीव्ही इत्यादी साधनांचा वापर बंद करावा. लहान मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ ही मर्यादित असेल याची काळजी घ्यावी. विश्रांतीच्या वेळी आणि विशेषतः जेवताना आपल्या सोबतीला टीव्ही किंवा मोबाईल फोन नसणे इष्ट. आठवड्यातील एखादा दिवस सर्वच डिजिटल माध्यमांपासून दूर राहून तो वेळ आपल्या परिवारासाठी देणे, किंवा निसर्गाच्या सान्निध्यात घालविणे मनाला उत्साहाने भरून टाकणारे असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना, पण आपण सर्वांनी ‘डिजिटल डीटॉक्स’ करून पाहायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment