केसांची भरपूर वाढीकरिता घरच्याघरी तयार करा असे तेल

hair
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये असंतुलित आहार, अनियमित झोप यांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असून, परिणामी शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. हार्मोन्सच्या असंतुलनाचे परिणाम त्वचेवर, केसांवर आणि शरीराच्या चयापचय शक्तीवर दिसून येत असतात. त्यामुळे त्वचेवर नको असलेले केस उगविणे, अॅक्ने, त्वचा निस्तेज दिसू लागणे, केसगळती, वजन वाढणे अश्या तक्रारी सुरु होतात. या तक्रारी रोखण्यासाठी उत्तम आणि संतुलित आहारासोबत केसांची योग्य निगा राखणे ही गरजेचे ठरते. आपण वापरीत असलेल्या निरनिराळ्या शँपू, किंवा इतर स्टायलिंग प्रोडक्टस् चे दुष्परिणाम केसांवर कालांतराने दिसून येऊ लागतात. केसांची नैसर्गिक चमक जाऊन केस निस्तेज दिसू लागतात. केसगळती वाढते. केस अकाली पांढरे होऊ लागतात. या तक्रारी दूर करण्यासाठी घरच्याघरी तेल तयार करता येईल. या तेलाच्या वापराने केसांशी निगडित सर्व समस्या दूर होऊन केसांची चांगली वाढ होते, आणि केस मुलायम व काळे राहण्यासही मदत होते.
hair1
हे तेल एकदाच तयार करून बाटलीत भरून ठेवून त्याचा आवश्यकतेप्रमाणे वापर करता येतो. यासाठी एक लिटर नारळाचे तेल एका पातेल्यात काढून घ्यावे. हे तेल मंद आचेवर गॅसवर तापावयास ठेवावे. तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा मोहोरी घालावी. मोहोरीच्या जोडीने तीन टेबलस्पून मेथीदाणे घालावेत. त्याचबरोबर सात ते आठ लवंगा आणि सात ते आठ मोठे चमचे भरून किसलेले आवळे घालावेत. त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा किसून घालावा. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
hair2
त्यानंतर या मिश्रणामध्ये एक मूठ भरून मेहेन्दीची हिरवी पाने घालावीत. मेहेंदीच्या पानांसोबतच एक मूठ भरून जास्वंदीची पाने, वीस जास्वंदीची फुले, एक मूठभरून तुळशीची पाने, ब्राह्मीची पाने, कढीपत्ता, पंधरा ते वीस दुर्वा असे सर्व तेलामध्ये घालून हे मिश्रण चांगले हलवून त्याचा कढ काढावा. हे मिश्रण पाच ते सहा मिनिटे चांगले उकळले, की गॅस बंद करून काळजीपूर्वक हे मिश्रण दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घ्यावे. थंड झाल्यानंतर हे तेल एक बरणीमध्ये भरून ठेवावे आणि आवश्यकतेप्रमाणे त्याचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment