तृणमूलच्या आणखी पाच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश


नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच गळती लागली आहे. तृणमूलचे नेते मागील काही महिन्यांपासून भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला आणखी राजकीय बळ मिळाले आहे. तर तृणमूल काँग्रेस आणखी एक हादरा बसला आहे.

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शहा यांनी ट्विट करून याची माहिती दिली. अमित शहा म्हणाले, तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील, असे शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेस व सध्या भाजपमध्ये असलेले नेते मुकूल रॉय आणि भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे या नेत्यांच्या प्रवेशावेळी उपस्थित होते. राजीब बॅनर्जी यांनी अलिकडेच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. तर वैशाली दालमिया यांची तृणमूलकडून पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली होती. प्रबीर घोषाल यांनाही तृणमूलचा राजीनामा दिलेला आहे. त्यातच आता तृणमूलचे बंडखोर नेते पार्थसारथी चट्टोपाध्याय हे सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.