एल्गार परिषद : नरेंद्र मोदींच्या व्यक्तिने फडकवला लाल किल्ल्यावर झेंडा : बी. जी. कोळसे पाटील


पुणे : एल्गार परिषदेला संबोधित करताना माजी न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान, ज्याने लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस असल्याचा थेट आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे.

कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेत बोलताना अनेक गोष्टींचा संदर्भ देत मोदी सरकारवर निशाणा साधला. देशासाठी पंतप्रधान मोदींनी बरच काही केल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात त्यांनी काहीही केले नसल्याचा आरोपही बी. जी. कोळसे पाटील यांनी मोदींवर केला आहे. तसेच पठाणकोटमध्ये मुंगीदेखील जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी दहशतवादी घुसले कसे?, असा प्रश्नदेखील कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

काल (शनिवारी) पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत एल्गार परिषद पार पडली. पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली होती. पण जर परवानगी मिळाली नाही, तर रस्त्यावर या परिषदेचे आयोजन करण्यात येईल, असा इशारा निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली होती.