आहाराबद्दल काही समज-गैरसमज

food
आजच्या काळामध्ये शरीराच्या तंदुरुस्तीच्या बाबतीत लोक जास्त जागरूक झालेले दिसतात. ज्यांना ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे निरनिराळे व्यायामप्रकार लोक अवलंबतात. व्यायामाप्रमाणेच संतुलित आणि पौष्टिक आहाराचे महत्व देखील आता लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे व्यायामाच्या जोडीने संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. आहार म्हटला की शाकाहार आणि मांसाहार हे भेद पर्यायाने येतातच. मांसाहाराचे सेवन मुख्यतः शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांच्या पूर्तीकरिता करण्याचा सल्ला दिला जात असतो. कारण प्रथिने शाकाहारातून पुरेशी मिळत नाहीत असा समज अनेकदा आढळून येतो. वास्तविक शेंगभाज्या, गहू, बाजरी, कडधान्ये आणि फळे यांच्याद्वारे शरीराला प्रथिने मिळत असतात. सामान्य शरीरयष्टीच्या माणसाला एका दिवसामध्ये दहा ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते. ही पूर्ती शाकाहाराच्या माध्यमातूनही होऊ शकते.
food1
आजकाल खाण्यामधून तेल किंवा तूप वर्ज्य करताना पाहिले जाते. पण आपल्या आहारामध्ये तेल किंवा साजूक तूप असणे अतिशय आवश्यक आहे. त्याने शरीराला उर्जा मिळतेच, त्याशिवाय त्वचेच्या आरोग्याकरिता, स्नायूंच्या लवचिकते करिता आणि त्वचेच्या सौंदर्याकरिता माफक प्रमाणात तुपाचे आणि तेलाचे सेवन केले जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये देखील महागड्या ऑलिव्ह ऑइल किंवा तत्सम तेलांच्या वापराऐवजी स्थानिक उपलब्ध तेले आणि घरी कढविलेले साजूक तूप वापरण्यास कधीही चांगले.
food2
दुधामध्ये कॅल्शियम मुबलक असून केवळ त्याच्या सेवनाने हाडे बळकट होतात हे म्हणणे चुकीचे ठरेल. दुधाच्या जोडीनेच ताज्या भाज्या, फळे यांच्यामधील पौष्टिक तत्वेही हाडांच्या बळकटीकरिता तितकीच आवश्यक असतात. तसेच कर्बोदके वजन वाढण्यास कारणीभूत असतात असा आणखी एक गैरसमज असून, अनेक लोक डायटिंगच्या नावाखाली लो कार्ब किंवा नो कार्ब आहार घेताना दिसतात. खरे तर साखर, मैदा आणि इतर रीफाइनड् पदार्थांतून मिळणारी कर्बोदके खाल्ली गेल्याने वजन वाढते. कर्बोदके आपल्या शरीराला मिळणाऱ्या उर्जेचे स्रोत आहेत. त्याचबरोबर ती कुठल्या पदार्थाच्या माध्यमातून आणि कुठल्या वेळी खाल्ली जावीत याचे योग्य नियोजन केल्यास वजन नियंत्रणामध्ये ठेवणे शक्य होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment