बिल गेट्स यांचा इशारा; भविष्यात येणारी महामारी कोरोनापेक्षाही दहापट भयंकर असेल


सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ही 10 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तर, या रोगामुळे 22 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान भारतासह अनेक देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर काही देश अजूनही लसीची प्रतीक्षा करत आहेत. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल, असा इशारा दिला आहे.

कोरोना महामारीपासून सर्व देशांनी धडा शिकला पाहिजे, असे मत गेट्स यांनी जर्मन मीडियाशी बोलताना व्यक्त केले. आगामी महामारीसाठी जग सज्ज नाही. सर्व देशांमधील सरकारने आपल्या नागरिकांचे संभाव्य महामारीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. सध्याची महामारी गंभीर आहे, पण भविष्यातील महामारी यापेक्षा 10 पट गंभीर असू शकते,’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पाच वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली असती तर त्यावरील औषध एवढ्या लवकर बनवणे शक्य नसते, असा दावा गेट्स यांनी केला आहे.

ज्या संस्था आणि शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यात मदत केली त्या सर्वांची गेट्स यांनी प्रशंसा केली. जागतिक नेत्यांनी व्हॅक्सिन राष्ट्रवादापासून दूर राहावे आणि लसीचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.