रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ


मुंबई : उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलची दारे सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुंबईकरांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलच्या जुन्या पासधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.

24 मार्च 2020 पासून मुंबई लोकल सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली. पण ज्या प्रवाशांनी त्यापूर्वी मुंबई लोकलचे एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे पास काढले होते. अशा प्रवाशांची मुदत लॉकडाऊनमध्येच संपली आहे. पण, लोकल सेवा बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की, नाही? असा प्रश्न सतत प्रवाशांकडून विचारला जात होता. पण, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण देत, प्रवाशांना पासची मुतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

रेल्वे पासचे लॉकडाऊननंतर जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना दिलासा मिळणार आहे.