काँग्रेस नेता कर्नाटक विधान परिषदेच्या सभागृहात पाहत होता अश्लील व्हिडीओ


बंगळुरु – कर्नाटक सरकारमधील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसची मोठी नाचक्की झाली असून विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे अश्लील व्हिडीओ पाहत असल्याची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये दिसत आहेत. राठोड यांनी यासंर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिले. इंटरनेटवर मी काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत असल्याचे राठोड म्हणाले आहेत.

सभागृहामध्ये मी सामान्यपणे मोबाईल घेऊन जात नाही. पण मला या सत्रामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मी याच कारणासाठी मोबाईल घेऊन आलो होते. मी त्याचसंदर्भात मोबाईल चेक करु लागलो. त्यावेळी माझ्या मोबाईलची मेमरी फूल झाल्याचे दिसल्यानंतर मी मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप डिलीट करु लागलो, असे राठोड सांगतात.

भाजपच्या प्रवक्त्यांनी राठोड यांच्या फोटोसंदर्भात बोलताना त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे वरिष्ठ सभागृह असून येथे विद्वान लोक येतात पण आज ते चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. मागच्या वेळेस काँग्रेसने मोठा गदारोळ माजवला होता. आज त्यांच्या पक्षाचा सदस्यच असे व्हिडीओ बघतानाचा फोटो समोर आला आहे. अपेक्षा आहे की राठोड यांच्याविरोधात डी. के. शिवकुमार कठोर कारवाई करतील आणि त्यांना पक्षातून काढून टाकतील, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरुन आता कर्नाटकमधील राजकारण तापण्याची चित्र दिसत आहे.