बीसीसीआयने यामुळे रद्द केली देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा


मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील बीसीसीआयने घेतला आहे.

सध्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिनाभर ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील एकदिवसीय स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील बीसीसीआयने घेतला आहे.

रणजी स्पर्धा घेण्यासाठी बीसीसीआयकडे पुरेसा वेळ नाही. मार्च महिन्याच्या शेवटी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरु होण्याची शक्यता असल्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध राहावे लागेल. बीसीसीआयमध्ये रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचे मत विचारलं होते. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. पण रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली होते.

कोरोना संकटात 2021 मधील सय्यद मुश्ताक अली ही पहिली स्पर्धा 10 जानेवारी रोजी सुरु झाली. या स्पर्धेची फायनल 31 जानेवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्याच्या निमित्ताने भारतामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटही मोठ्या कालावधीनंतर सुरु होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट पाच फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरु होणार आहे.