ना समुद्रामध्ये सामावते, ना इतर नद्यांना मिळते अशी ही ‘लुनी नदी’

river
नद्या आपले जीवनस्रोत आहेत. प्राचीन काळच्या संस्कृती सर्वप्रथम नद्यांच्या किनारीच वसल्या, वाढल्या, संपन्न झाल्या. भारतातील बहुतेक मोठ्या नद्या समुद्रामध्ये किंवा महासागारांमध्ये विलीन होणाऱ्या आहेत, तर लहानलहान नद्या, इतर नद्यांना जाऊन मिळणाऱ्या आहेत. पण भारतामध्ये एक नदी अशी ही आहे, जी ना सागरामध्ये विलीन होते, ना इतर कुठल्या नदीला जाऊन मिळते. ही नदी आहे, राजस्थानातील ‘लुनी’ नामक नदी.
river1
अरावली पर्वतराजीतील नागा पर्वतातून उगम पावणारी ही लुनी नदी आहे. नागा पर्वत राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यामध्ये आहे. या पर्वतावर समुद्रसपाटीपासून ७७२ मीटरच्या उंचीवर लुनी नदीचा उगम आहे. या भागाध्ये लुनी नदीला ‘सागरमती’ नावाने ओळखले जाते. ही नदी अजमेर जिल्ह्यामध्ये उगम पावून, दक्षिण-पश्चिम दिशेला गुजरातकडे वळते. नागौर, पाली, जोधपुर, बाडमेर, आणि जालोर जिल्ह्यांतून ४९५ किलोमिटचा प्रवास करीत ही नदी कच्छच्या रणामध्ये येऊन थांबते. इथे रणामध्ये ही नदी सामावत असून, पुढे अन्य कोणत्याही नदीला जाऊन मिळत नाही.
river2
राजस्थानमध्ये पाऊस कमी असून, उन्हाळा जास्त असल्याने लुनी नदीला पाणी मुळातच कमी असते. तसेच राजस्थान येथील बहुतेक भूभाग वाळूचा असून, त्यामुळे पाणी जमिनीमध्ये न झिरपता, वाहून जाते. उन्हाळा खूप जास्त असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही येथे जास्त आहे. लुनीच्या उगमापासून काही किलोमीटर अंतरापर्यंत नदीचे पाणी गोड आहे, मात्र बाडमेर जिल्ह्यामध्ये जमिनीमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने या जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर नदीचे पाणी खारे होऊन जाते. पाणी जरी खारे असले, तरी या प्रांतातील शेती व्यवसाय याच नदीच्या जलस्रोतावर अवलंबून आहे.
river3
पावसाळ्यामध्ये मात्र, जर पाऊस चांगला झाला असला, तर लुनी नदी पाण्याने दुथडी भरून वाहात असते. त्यामुळे या नदीचे दर्शन घेण्यासाठी पावसाळ्याचा मौसम योग्य आहे.

Leave a Comment