केळ्यांच्या सालींचा करा असाही वापर

banana
केळे हे फळ जवळजवळ वर्षभर अगदी मुबलक उपलब्ध असणारे, आणि आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्क मंडळींपर्यंत सर्वांना पचेल आणि रुचेल असे हे फळ आहे. आजारपणात देण्यासाठी योग्य आणि शारीरिक थकवा पटकन दूर करणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असणारे असे, आणि खिश्याला देखील सहज परवडणारे असे हे फळ आहे. पण केवळ हे फळच नाही तर याची साल देखील उपयुक्त असते. केळ्याच्या सालीचा उपयोग कसा करून घेता येईल हे जाणून घेऊ या.
banana1
अनेकदा कॉम्प्युटरवर सातत्याने काम केल्याने, किंवा जागरण झाल्याने डोळे चुरचुरतात, लालसर दिसू लागतात, अश्या वेळी केळ्याच्या सालीची आतील बाजू डोळ्यांवर ठेवावी. त्यामुळे डोळ्यांचा लालसरपणा दूर होऊन डोळ्यांना थंडावा मिळतो. सततच्या चहा कॉफीच्या सेवनाने किंवा इतर काही कारणांनी दात पिवळसर दिसू लागतात. दातांना पुन्हा शुभ्र बनविण्यासाठी सकाळी दात घासून झाल्यानंतर केळीची साल दातांवरून हलका दाब देऊन फिरवावी. हा उपाय दोन आठवडे करावा. त्यानंतर दातांचा पिवळसरपणा दूर होऊन दात शुभ्र दिसू लागतील.
banana2
जर त्वचेवर चामखीळ किंवा लहान मस असतील, तर त्यावर केल्याची साल रगडावी. काही दिवसांत मस नाहीसे होतीलच आणि पुन्हा उद्भविण्याची संभावना देखील कमी होईल. प्रदूषण, सौंदर्यप्रसाधनांचा अति वापर, असंतुलित आहार, शांत झोपेचा अभाव, शरीराला पुरेशी न मिळणारी विश्रांती आणि मानसिक तणाव या सर्वांचा दुष्प्रभाव सर्वात आधी त्वचेवर पहावयास मिळतो. अश्या वेळी चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ लागतात, मुरुमे, पुटकुळ्यांमुळे चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. अश्या वेळी केळ्याची साल उपयोगी पडू शकते. केळ्याची साल चेहऱ्यावर रगडून, अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. मुरुमे, पुटकुळ्या किंवा सुरकुत्या नाहीशा होईपर्यंत आणि त्यानंतरही हा उपाय करावा. हा उपाय सोरायसिस करिता ही चांगला आहे.
banana3
खूप श्रम झाल्याने अनेकदा पाय दुखू लागतात. अश्या वेळी केळ्याची साल दुखऱ्या भागावर चोळावी, केळ्याच्या सालीमध्ये वेदनाशामक तत्वे असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये दोन केळी खावीत आणि त्यासोबत केळ्याची साल खरवडून तो गर ही खावा. ही आहारपद्धती अवलंबताना रात्रीचे जेवण अगदी हलके, शक्यतो द्रव आहार असावा. या आहारपद्धतीच्या फलस्वरूप लवकरच वजन घटताना दिसून येईल.

Leave a Comment