फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने सुरु केला अॅमेझॉनच्या विरोधात तपास


मुंबई: आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. याबाबत माहिती देताना ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

ईडीला वाणिज्य मंत्रालयाकडून या कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळते. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून अॅमेझॉनसोबतच आता फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांविरोधातही कारवाई करण्याचे संकेत मिळत असल्यामुळे या कंपन्यांसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दिल्ली उच्च न्यायालयानेही या आधी अॅमेझॉन विरोधात टिप्पणी केली होती. रिलायन्स समूह आणि फ्यूचर रिटेल ग्रुपमध्ये झालेल्या कराराला अॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात यावर सुनावणी करताना सांगितले होते की काही तडजोडींच्या माध्यमातून फ्यूचर रिटेल ग्रुपवर अॅमेझॉन आपले अप्रत्यक्ष स्वरुपात नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे फेमा आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक कायद्याचे (FDI) उल्लंघन समजले जाईल.

ईडीने दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी आणि वाणिज्य मंत्रालयाचे निर्देश आल्यानंतर अॅमेझॉन विरोधात तपास सुरु केला आहे. अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की ईडीच्या या तपासाबद्दल अॅमेझॉनला अजून तरी काहीच माहित नाही. सूत्रांनी सांगितले की आता या संपूर्ण प्रकरणाचा ईडी सखोल तपास करणार आहे आणि लवकरच अॅमेझॉनकडून याची सविस्तर माहिती मागवण्यात येणार आहे.