दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ आयईडी स्फोट​


नवी दिल्ली : कृषि विधेयकांविरोधातील शेतकरी आंदोलनाने गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटाने हादरली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली दूतावासापासून जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. घटनास्थळी स्पेशल सेल दाखल झाले असून या स्फोटामुळे काही गाड्यांचे नुकसान झालेल्याची प्राथमिक माहिती असली तरी या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेले नाही.

हा स्फोट जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे झाल्याचे समजते. हा स्फोट ‘आयईडी’च्या माध्यमातून घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. हा भाग संवेदनशील समजला जातो. या परिसरात ब्राझीलचे दूतावासही आहे. या भागात नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते

स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू असून हो स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे वृत्त आहे. इस्रायली दूतावासाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा स्फोटामुळे फुटल्याचीही माहिती समोर येत आहे.