राज ठाकरेंच्या कुटुंबियांवर पहिल्यांदाच शिवसेनेने केली जाहीर टीका


मुंबई: आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये बैठक सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी देखील मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. पण या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याचपार्श्वभूमीवर मनसेवर खोचक टीका केली आहे.

वरुण सरदेसाई यांनी मनसेवर शॅडोचे पण माझे कुटुंब – माझी जबाबदारी, असे ट्विट करत खोचक टीका केल्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबियांवर आतापर्यंत वैयक्तिक टीका टाळणाऱ्या शिवसेनने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबाबाबत जाहीर टीका केल्याने मनसे यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी 27 फ्रेब्रुवारीला मराठी भाषा दिनी, उत्सव म्हणून साजरा केला जाईल. मराठी स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे, अशी माहिती दिली. तसेच अनेक ठिकाणी राज ठाकरे हे स्वतः स्वाक्षरी करण्यास जाणार आहेत. मराठी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. पक्षाचा 9 मार्च हा वर्धापनदिन आहे. यावेळी निवडणुकाजवळ आलेल्या आहेत. 9 फ्रेबुवारी ते 12 एप्रिलपर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल, अशी माहिती बाळा नांदगांवकर यांनी यावेळी दिली.

राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्याचे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान नियोजन पक्षाकडून केले जात असल्याचे समजते. पक्षाचा झेंडा मनसेने बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचे बोललं जात होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आले असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.

उत्तर भारतीयांविरोधातील मनसेची भूमिका मवाळ झाली, तर पुढचा विचार होऊ शकेल, असेही विधान भाजपकडून करण्यात आले होते. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनसेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका आज सकाळपासूनच वरुण देसाई यांनी सुरू केली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वीरप्पन गँग असा केला, त्यावर वरुण सरदेसाई यांनी पलटवार करत मनसे खंडणीखोर असल्याची टीका केली. वरुण सरदेसाई यांच्या या टीकेला पुन्हा संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. मी वीरप्पनबद्दल बोललो, तर वरुण देसाईला का झोंबले, माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.