नारायण राणेंच्या कामगिरीवर खुश होऊन कोकण दौऱ्यावर जाणार अमित शहा


मुंबई : पुढील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित शहा भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. पण, अमित शहा यांचा दौरा आता नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शहा यांचा कोकण दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शहा ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हेही सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अलीकडेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले यश मिळाले. कोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे आव्हान देणे भाजपला साध्य करता आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असून, नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारने केलेल्या सुरक्षा कपातीनंतर नारायण राणे यांना थेट केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षे व्यवस्थेनुसार १२ सी.आय.एस.एफचे जवान नारायण राणे यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे.