21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा


नवी दिल्ली : लाभार्थ्यांना आता 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी -ESIC) योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहेत. ही सेवा आतापर्यंत 387 जिल्ह्यांमध्येच मिळत होती. तर 187 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणातच आरोग्य सेवा उपलब्ध होत्या, तर 161 जिल्ह्यांमधील ESIC लाभार्थ्यांना कोणत्याच सुविधा मिळत नव्हत्या.

आरोग्य केंद्र किंवा एम्प्लॉयीज स्टेट इन्श्युरन्स कार्पोरेशनचा करार असलेल्या रुग्णालयांमध्येच ईएसआयसी सदस्यांना उपचार घेता येत होते. आता ईएसआयसी लाभार्थ्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJAY) सर्वत्र आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. याबाबत एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कार्पोरेशनच्या स्थायी समितीचे सदस्य एस. पी. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत ईएसआयसी लाभार्थ्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी प्रस्तावित बजेटला मंजुरी दिल्यामुळे ईएसआयसी सदस्यांना 1 एप्रिल 2021 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होतील.

ईएसआयसीने नवीन ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याकरिता नॅशनल हेल्थ अथॉरिटीबरोबर (NHA) एक सामंजस्य करार केला असल्यामुळे ESIC लाभार्थ्यांना ABPMJAY पॅनेलच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मिळेल. ABPMJAY योजना देशातील कोणत्याही रुग्णालयात ESIC कर्मचाऱ्यांना सेवा मिळेल अशी माहिती एस. पी. तिवारी यांनी दिली. ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटरचेही ते सदस्य आहेत. ईसीआयसी स्थायी समितीने यासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2020-21 साठीच्या आर्थिक तरतुदीचा आढावा घेत, पुढील वर्षाच्या आर्थिक तरतुदीचाही निर्णय घेतला असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

हरियाणातील बवल, बहादूरगड, तमिळनाडूतील त्रिपुर, उत्तरप्रदेशातील बरेली, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 100 बेड्सची रुग्णालये उभारण्याच्या बजेटला ईएसआयसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर नागपूरमधील बुटीबोरी येथे 200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. इंदोरमधील नंदनगर रुग्णालयातील खाटांची संख्या 500 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. बिहारमधील फुलवारी येथील आणि पाटण्यातील 50 खाटांच्या रुग्णालयाची क्षमता 100 खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

दरमहा 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या औद्योगिक कर्मचाऱ्यांचा ईएसआयसी योजनेत समावेश होतो. दर महिन्याला त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापून घेऊन ती आरोग्य सुविधांसाठी जमा केली जाते. 0.75 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून तर 3.25 टक्के रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते.