अयोध्येत निर्माणाधिन मशीदबाबत ओवैसींचे चिथावणीखोर वक्तव्य


नवी दिल्ली: अयोध्येत बांधल्या जात असलेल्या मशिदीबद्दल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ही नवी मशीद ज्या जागी उभारली जात आहे, तिथे नमाज पढणेही हराम आहे. विविध धार्मिक गुरूंनी ओवेसींच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.

ओवैसी म्हणाले, पाच एकर जमीन घेऊन बाबरी मशिदीच्या जागी मशीद बांधत आहेत आणि तिला एका स्वातंत्र्यसैनिकाचे, अहमदुल्लाचे नाव देऊ इच्छित आहेत. अरे दुष्टांनो, ओंजळभर पाण्यात बुडून मरा… ते जर जिवंत असते तर तेही म्हणाले असते की… प्रत्येक धर्माच्या ज्येष्ठांना मी विचारले, मुफ्तींना विचारले, जबाबदार लोकांना विचारले. प्रत्येकाचे म्हणणे आहे की तिथे नमाज पढता येणार नाही. बाबरी मशिदीच्या हौतात्म्यानंतर ज्या जागी पाच एकर जमिनीवर मशीद बांधली जात आहे तिथे नमाज पढणेही हराम आहे.

ओवैसी एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले, बाबरी मशिदीच्या बदल्यात पाखंड्यांचा समुदाय जो 5 एकर जमिनीवर मशीद बांधत आहे,. तो मशीद नाही तर ‘मस्जिद-ए-ज़ीरार’ आहे. या पाखंड्यांनी मुहम्मदुर रसूलुल्लाहच्या काळात मुसलमानांना मदत करण्याच्या नावाखाली एक मशीद बांधली होती. वास्तविक त्या मशिदीत नबीचा खात्मा आणि इस्लामला नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता. (कुराणात त्याला ‘मस्जिद -ए- ज़ीरार’ म्हटले गेले आहे.) अशा मशिदीत नमाज पढणे आणि त्यासाठी देणगी देणे हे हराम आहे. ओवैसी यांनी याआधीही राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळी म्हटले होते की अयोध्येत बाबरी मशीद होती, आहे आणि राहील.

राम मंदिराचे बांधकाम अयोध्येत चालू झाल्यानंतर मुस्लिम समाजाला मिळालेल्या 5 एकर जागेत प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने मशिदीची पायाभरणी झाली. धनीपूर गावात ही मशीद बांधली जात आहे आणि तिचे नाव स्वतंत्रता सेनानी मौलवी अहमदुल्ला शाह यांच्या नावावरून ठेवण्याचा विचार चालू आहे. मशिदीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देण्यात आलेल्या 5 एकर जमिनीवर मशिदीशिवाय रुग्णालय, ग्रंथालय आणि सांस्कृतिक संसोधन केंद्रही उभारले जाणार आहे.