मागील सात दिवसात देशातील १४७ जिल्ह्यांमध्ये आढळला नाही एकही कोरोनाबाधित


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे कमी झालेले नसले, तरी त्याचा वेग मात्र नक्कीच कमी झाल्याचे दिसून येत आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत आहे. मागील काही दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी नवे कोरोनाबाधित रुग्ण देखील आढळले नसल्याचे समोर आले आहे. तसेच, मागील २४ तासांमध्ये देशभरात १४ हजार ३०१ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर, देशात आतापर्यंत १ कोटी ३ लाख ७३ हजार ६०६ जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

मागील सात दिवसांत देशभरातील १४७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. १८ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसात, सहा जिल्ह्यांमध्ये मागील २१ आणि २१ जिल्ह्यांमध्ये मागील २८ दिवसांत कोरोनाची केस आढळलेली नाही. असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. तर, कोरोनाच्या ७० टक्के केसेस या महाराष्ट्र व केरळमधील असल्याचेही त्यांनी सांगितले असून, आतापर्यंत भारतात १५३ यूके व्हेरिएंटची प्रकरणे आढळल्याचेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले आहेत.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये देशभरात ११ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता १ कोटी ७ लाख १ हजार १९३ वर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. देशात १ लाख ७३ हजार ७४० अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एकूण २३ लाख ५५ हजार ९७९ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालपर्यंत (२७ जानेवारी) देशभरात १९,४३,३८,७७३ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी ७ लाख २५ हजार ६५३ नमूने काल तपासले गेले असल्याची माहिती, आयसीएमआरकडून मिळालेली आहे.