दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका, उद्रेक झाला तर थांबवणार कोण ? उदयनराजे


सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. आम्हाला दुसऱ्यांचा लाभ काढून देऊ नका. सर्वांना न्याय दिला मग आम्हाला का नाही? असा सवाल विचारातानाच, आमचा अंत पाहू नका. एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार आणि हा उद्रेक नक्की होणार, असा इशाराही उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा साताऱ्यात पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या सोहळ्याला एकाच मंचावर आले होते.

मराठा समाज सधन असल्याचे सर्वांना वाटते. पण मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे. जास्त मार्क मिळवूनही विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे. तुमच्या अधिकारासाठी लोकप्रतिनिधी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्हीपण तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहायला हवे, असे आवाहन उदयनराजे यांनी मराठा समाजाला केले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेत्यांनी अनेक वर्ष राज्याचे नेतृत्व केले. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालायला हवे, असे आवाहनही उदयनराजेंनी केले आहे. आज आण्णासाहेब फाऊंडेशनची नरेंद्र पाटील यांनी स्थापना केली. त्यांचे आयुष्य त्यांनी मराठा समाजासाठी अर्पण केले. मी आण्णासाहेब पाटील यांच्या कामाबद्दल ऐकूण आहे. त्यांचे काम खूप मोठे आहे. मराठा आरक्षणाबाबतचे राजकारण आता थांबले पाहिजे, यावर लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे. यांना कोणती भाषा कळते हे समजत नाही. लोकांनी मोर्चे काढले तरी यांना कळत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही उदयनराजेंनी व्यक्त केली.

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि टिकवले, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालत असल्याची टीका केली. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नाकर्तेपणावर शिवेंद्रराजे भोसले यांनी बोट ठेवले. आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले हे सर्वांना मान्य करावे लागेल. फडणवीसांनी नुसते आरक्षण दिले नाही तर ते न्यायालयातही टिकवले होते. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेले. पण राज्य सरकारला ते टिकवता आले नसल्याचे ते म्हणाले.