11 वर्षाच्या मुलाकडून वडिलांना 10 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी


लखनऊ : दिवसेंदिवस सायबर क्राईम ही समस्या जास्त गंभीर होताना दिसत आहे. या माध्यमातून अनेकांना लुबाडले जात आहे. पण एक विचित्र प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये समोर आला आहे. आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक करत एका अकरा वर्षाच्या मुलाने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे इयत्ता पाचवीत शिकणारा हा मुलगा युट्यूबवर हॅकिंग शिकला असून त्याने त्यानंतर आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक केला. पोलिसांनी तपास केला असता धमकीचा मेल हा पीडित वडिलांच्या घराच्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली.

गाझियाबादच्या वसुंदरा कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला गेल्या आठवड्यात अचानक धमकीचा फोन आला. 10 कोटी रुपयांची खंडणी या मेलद्वारे मागण्यात आली होती. यासोबतच 10 कोटी रुपये नाही दिले तर तुमचे अश्लील फोटो सार्वजनिक करु, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जीवे मारु, अशी धमकी देण्यात आली. त्याचबरोबर संबंधित मेल एका हॅकर्स ग्रुपकडून पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

संबंधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय हॅकर्सचा ईमेल पाहून हैराण झाले. त्यांनी भरपूर विचार केला. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला. पण अखेर तातडीने संबंधित व्यक्तीने पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आपल्याला आलेला ईमेल त्या व्यक्तीने पोलिसांना दाखवला. सर्व ईमेल पोलिसांनी सविस्तर वाचल्यानंतर त्यांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर ईमेल कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसहून पाठवण्यात आला याचा तपास केला. पोलिसांच्या हाती या तपासात जी माहिती लागली त्याने त्यांनाच मोठा धक्का बसला. कारण ईमेल आयडीचा आयपी अ‍ॅड्रेस हा तक्रादार व्यक्तीच्या घरच्याच आयपी अ‍ॅड्रेसवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे एक पाऊल पुढे टाकत तक्रारदार व्यक्तीच्या घरच्यांची चौकशी केली.

तक्रारदार व्यक्तीच्या 11 वर्षीय मुलाची पोलिसांनी चौकशी केली असता त्या मुलाने आपला गुन्हा कबूल केला. याशिवाय त्याने यूट्यूबवर आपण हॅकिंग शिकल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. काही दिवसांपूर्वी या मुलाला कम्प्युटर क्लासदरम्यान सायबर क्राईम म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे हे शिकवण्यात आले होते. पण, तरीही मुलगा आपल्या वडिलांसोबत अशाप्रकारे का वागला? याचा तपास पोलीस करत आहेत.