शेतकरी आंदोलनातून दोन संघटनांनी घेतली माघार​


नवी दिल्लीः देशातील विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनात फूट पडली असून दोन शेतकरी संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. या आंदोलनातून व्ही. एम. सिंह यांची राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियन (भानु ) या गटाने माघार घेतली आहे.

शेतकरी आंदोलनातील काहींचा हेतू हा वगेळा असल्यामुळे या आंदोलनातून आम्ही माघार घेत आहोत. आंदोलन करणाऱ्या इतर संघटनांना आमच्या शुभेच्छा, असे व्ही. एम. सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचा आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय आहे. हा निर्णय ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचा (AIKSCC) नाही. व्ही.एम. सिंह आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे व्ही. एम. सिंह यांनी सांगितले.

भारताचा राष्ट्रध्वज आणि त्याचा आदर राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पण ही मर्यादेचे प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारात उल्लंघन केले गेले. मर्यादेचे उल्लंघन करणारे आणि तिचे उल्लंघन करण्यास करू देणारेही चुकीचे आहेत. आयटीओमध्ये आमच्या एक साथीदार शहीद झाला. ज्याने त्याला चिथावले त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे व्ही. एम. सिंह म्हणाले. शेतकरी आंदोलनातून भारतीय किसान युनियनमधील भानु प्रताप सिंह यांचा गटही बाहेर पडला आहे. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने दुःखी आहे. लाल किल्ल्यावरील घटनेने चिंतेत आहे. यामुळे आम्ही धरणे आंदोलन थांबवत असल्याचे भानु प्रताप सिंह म्हणाले.