या तारखेला चेन्नईत होणार आयपीएल 2021चा लिलाव


नवी दिल्ली – कोरोना संकटामुळे मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये यूएईत आयपीएलचे सामने खेळवल्यानंतर आता आयपीएलचा पुढील हंगाम हा भारतातच खेळवण्याच्या हालचाली बीसीसीआयकड़ून सुरु झाल्या असून त्या अनुषंगाने इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

2021 च्या आयपीएलसाठी फ्रँचायझींना आपल्या संघात थोडेफार बदल करण्याची संधी बीसीसीआयने दिली आहे. त्यानुसार सर्व फ्रँचायझींनी आपापल्या संघातील काही खेळाडूंना रिलीज केले आणि नव्या खेळाडूंसाठी जागा रिक्त केली आहे. सर्व फ्रँचायझींनी रिटेशनमध्ये मिळून 139 खेळाडूंना कायम राखले, तर 57 खेळाडूंना रिलीज केले. बीसीसीआयने बुधवारी आयपीएल 2021च्या लिलावाची तारीख व ठिकाण जाहीर केले आहे. त्यानुसार आता आयपीएल 2021साठीचा लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईत होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.

स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील,असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. आयपीएल २०२० कोरोनामुळे यूएईत खेळवला गेला. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे भारतात आयोजन होणार असल्याने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आहे. २० जानेवारीला सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख देण्यात आली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो)जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे.