आता राज ठाकरे शेतकरी आंदोलनावर काय बोलणार?


पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. काल पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्यांनी पुणे दौरा महापालिका आणि पक्ष बांधणीसाठी केला. पुण्यावरुन मुंबईकडे निघताना राज ठाकरे यांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी यावर नंतर बोलणार असल्याचे सांगितले.

शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे हे नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली होती. आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावरुन मोदी-शहांवर राज ठाकरे निशाणा साधणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. थेट लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी कूच केली. यादरम्यान, शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री ठरलेला मार्ग सोडल्यामुळे झाली. एका आंदोलकाचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. तर जवळपास 300 पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या वाहनांवर शेतकऱ्यांनी हल्ला करुन प्रचंड तोडफोड केली. तर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड हिंसाचार घडला. केंद्रीय गृहमंत्रालयाने यापार्श्वभूमीवर तातडीने परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी कालपासून मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. राज ठाकरेंनी या दौऱ्यावेळी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनसे नेते बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. येत्या पुणे महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एकूण 45 मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी होणारी बैठक शुक्रवारी 29 जानेवारीला होईल, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.