संसदेच्या कँटीनमधील जेवणाचे नवे रेट कार्ड जारी


नवी दिल्ली – २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी ससंदेतील कँटीनमध्ये मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला. यानंतर आता संसदेच्या कँटीनमधील जेवणाचे नवं रेट कार्ट जारी करण्यात आले आहे.

संसदेच्या कँटीनमध्ये आता १०० रूपयांना शाकाहारी थाळी आणि ७०० रूपयांना मांसाहारी बुफे मिळणार आहे. यापूर्वी संसदेतील कँटीनमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांवरील अनुदान बंद करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती. आता संसदेच्या कँटीनमध्ये चपाती हा एकमेव सर्वात स्वस्त एकच पदार्थ राहिला आहे. कँटीनमध्ये ३ रूपये चपातीची किंमत ठेवण्यात आली आहे. तर आता ७०० रूपये मांसाहारी बुफे लंचसाठी, १०० रूपये चिकन बिर्याणीसाठी, चिकन करी ७५ रूपये, साधा डोसा ३० रूपये आणि मटण बिर्याणीसाठी १५० रूपये खर्च करावे लागणार आहेत.

यापूर्वी संसदेच्या कँटीनमध्ये अन्नपदार्थांवर देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निर्णय घेतला होता. हे अनुदान रद्द करण्याचा निर्णय लोकसभेच्या बिझनेस अॅडव्हाझरी समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने घेतला होता. या कँटीनमध्ये मिळणारे पदार्थ आता ठरवण्यात आलेल्या दरांवरच मिळणार आहेत.

संसदेच्या कँटीनला दरवर्षी १७ कोटी रूपयांचे अनुदान दिले जात होते. २०१७-१८ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागणवण्यात आलेल्या माहितीतून संसदेच्या कँटीनमध्ये चिकन करी ५० रूपयांमध्ये तर शाकाहारी थाळी ३५ रूपयांमध्ये मिळत असल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे थ्री कोर्स लंचचे दर १०६ रूपये तर डोसा केवळ १२ रूपयांमध्ये मिळत असल्याचे समोर आले होते.