केरळ उच्च न्यायालयाने विराट कोहलीला पाठवली नोटिस


नवी दिल्ली – केरळ उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मोठा दणका दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने ऑनलाईन रम्मी गेम्सचा सदिच्छादूत असलेल्या विराटसह अभिनेत्री तमन्ना आमि अजु वर्गीज यांना नोटिस पाठवली आहे. केरळ उच्च न्यायालयात या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती आणि तरुण पिढीला या गेममुळे व्यसन लागत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

राज्य सरकारलाही उच्च न्यायालयाने नोटिस पाठवली आणि त्यांची प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. अनेकांनी ऑनलाईन गेममधून पैसे गमावल्याने आत्महत्या केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे त्याने ऑनलाईन गेमवर बंदीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी तिरूवनंतपुरम येथील कुट्टीचल येथे २७ वर्षीय विनीथने आत्महत्या केली. ऑनलाईन खेळात त्याने २१ लाख रुपये गमावले होते.

ऑनलाईन रमी गेममध्ये ३३ वर्षीय साजेश यानेही खूप पैसे गमावले. साजेश याने सांगितले की, या प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, त्याचे स्वागत आहे. अनेकांना ऑनलाईन गेममध्ये आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मी स्वतः ६ लाखांहून अधिक रक्कम गमावली आहे. सदिच्छादूतांमुळे या अशा गेम्सकडे युवावर्ग आकर्षित होतो.