हैदराबाद; पत्नी प्रियकरासोबत पळून गेली म्हणून केली १८ महिलांची हत्या


हैदराबाद – १८ महिलांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपीचा महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर नुकत्याच दोन महिलांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचाही उलगडाही झाला आहे.

यासंदर्भात वृत्त पीटीआयने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याला याआधी २१ प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. आरोपीचे वयाच्या २१ व्या वर्षीय लग्न झाले होते. पण त्याची पत्नी लग्नानंतर काही दिवसांतच एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. त्याच्या मनात तेव्हापासून महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२००३ पासून आरोपीने गुन्हे करण्यास सुरुवात केली. तो शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. तो त्या महिलेची एकत्रित मद्यप्राशन केल्यानंतर हत्या करायचा आणि नंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरुन घटनास्थळावरुन पळ काढायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.