एलन मस्क यांनी एक ट्विट केले आणि कंपनीची लागली ‘लॉटरी’…


सध्या जगातील आघाडीची इलक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क बरेच चर्चेत आहेत. मस्क कधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तर कधी त्यांच्या कंपनीच्या शेअर्सने घेतलेल्या उसळीमुळे यांच्याबाबतच्या बातम्या येत असतात. आता मस्क यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की नुसते एक ट्विट जरी त्यांनी केले तरी छोट्या-मोठ्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढत आहेत.

मंगळवारी ‘I kinda love Etsy’ हे ट्विट एलन मस्क यांनी केले. Etsy कंपनीच्या शेअर्समध्ये त्याच्या या ट्विटनंतर लगेचच जवळपास 10 टक्क्यांची उसळी बघायला मिळाली. एकापाठोपाठ एक असे दोन ट्विट मस्क यांनी केले. ‘I kinda love Etsy’ असे त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले. तर, Etsy वरुन माझ्या पाळीव कुत्र्यासाठी हाताने विणलेले लोकरापासून बनवलेले मार्विन द मार्टियन हेल्म विकत घेतले, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले. मस्क यांच्या या ट्विटनंतर Etsy ची अक्षरशः लॉटरी लागली. शेअर मार्केट सुरू होताच कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची तेजी आली. गेल्या 12 महिन्यांतील कंपनीसाठी ही सर्वात मोठी वाढ होती. Etsy एक ई-कॉमर्स वेबसाइट असून त्यावर हँडमेड प्रोडक्ट्स मिळतात.