शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार डॉ. धवलसिंह मोहिते पाटील


सोलापूर : उद्या (28 जानेवारी) सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर आता ते काँग्रेसचा हात धरणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस भवनमध्ये हा प्रवेश होणार आहे. या वृत्ताला स्वत: डॉ धवलसिंह यांनी दुजोरा दिला आहे

सुरुवातीला शिवसेनेत अनेक वर्षे राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. पण भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने सेनेतून म्हणावा तसा न्याय धवलसिंह यांना मिळाला नव्हता. यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यावर, शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे डॉ धवलसिंह यांनी सुरु केले होते.

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी धवलसिंह याना गळाला लावले. गेल्या विधानसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपसाठी ही जागा कशीतरी टोकावर निवडून आणता आली होती. पण यानंतरही धवलसिंह यांना राष्ट्रवादीमध्ये दुर्लक्षित केल्याचे लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापुरात काँग्रेस धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात. शिवाय मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्येही मदत झाली होती. मोहिते विरुद्ध मोहिते ही लढाई त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पिढीतही अखंडपणे सुरु ठेवली होती. विजयसिंह मोहिते पाटील गटाला विरोध करण्याचं काम ते करत होते. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते. परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.