नवी दिल्ली – 26 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून आतापर्यंतहिंसाचार आणि तोडफोडी प्रकरणी 22 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. तर 200 पेक्षा जास्त उपद्रव्यांना अटक करण्यात आली आहे. उपद्रव्यांविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. आता क्राइम ब्रांचकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
शेतकरी रॅलीतील हिंसेविरोधात 22 FIR ; 200 पेक्षा जास्त उपद्रव्यांना अटक
जे FIR पोलिसांनी दाखल केले आहे, त्यातील एका एफआयआरमध्ये 6 शेतकरी नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यात- राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस उपद्रव्यांची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने आज पुन्हा लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, काल झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. एका अॅडिशनल डीसीपीवर तलवारीने हल्ला करण्यात आला.
सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. शेतकरी येथूनच आंदोलनात सक्रीय झाले होते. तिकडे, लाल किल्यावरदेखील सुरक्षा वाढवली आहे. तिथे सध्या रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे परिसरात लक्ष्य ठेवले जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी बुधवारी लाल किल्ल्यावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.