प्रगल्भ लोकशाहीच्या निर्मितीसाठी मूल्याधारित मतदार शिक्षण आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर


मुंबई : प्रगल्भ लोकशाहीसाठी नागरिकांची प्रगल्भ मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. शाळेत ज्याप्रमाणे मूल्याधारित शिक्षण देणे आवश्यक असते, त्याच पद्धतीने मतदारांनाही मूल्याधारित मतदार शिक्षण दिले पाहिजे असे मत राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. अनेक पुढारलेले देश अजूनही कागदी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेत असताना तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि यशस्वी वापर करत ईव्हीएमद्वारे निवडणुका घेत भारत निवडणूक आयोगाने जगामध्ये एक आदर्श उदाहरण ठेवल्याचेही डॉ.काकोडकर म्हणाले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, राज्याचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, अभिनेत्री व सदिच्छादूत निशिगंधा वाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्य निवडणूक आयुक्त मदान म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत मतदारांच्या सुविधेसाठी अनेक उपक्रम राबवले. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, ऑनलाईन मतदार नोंदणी, मतदार शोध, नामनिर्देशन भरणे आदी अनेक बाबी ऑनलाईन केल्या. मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतेची बाब आहे. त्यावर आयोगाने काही उपाययोजना केल्या असून नोटा (NOTA) बटनाची तरतूद केली. राज्य निवडणूक आयोगानेही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘नोटा’ला इतर उमेदवारांपेक्षा अधिक मते असल्यास अशा ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन भरणे, ट्रू व्होटर, नो युवर कँडिडेट, निवडणूक खर्च माहिती ऑनलाईन भरणे आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

मतदार नोंदणी करणे बंधनकारक असावे, असे मत मांडतानाच मदान म्हणाले की, सुप्रशासनासाठी सर्वांनाच मतदानाचा हक्क आणि निवडणूक लढविण्याचा हक्क दिला आहे. त्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. मतदारांनी सजगपणे, विचारीपणाने योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दोन ठिकाणी बोलीद्वारे निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यामुळे तेथील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेसारखेच ‘जागो मतदार जागो’ मोहीम राबविली पाहिजे, असेही मदान म्हणाले.

मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सांगितले की, कोविड काळामध्ये सुरुवातीला जेव्हा केवळ 80 रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. निवडणूक काळात वाहने ज्याप्रमाणे अधिग्रहित केली जातात; त्याप्रमाणे खासगी वाहने अधिग्रहित करुन त्यांचे रुग्णवाहिकांत रुपांतर करत दोन आठवड्यातच रुग्णवाहिकांची संख्या 1 हजारावर नेली. निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवाचा येथे उपयोग झाला. भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक व्यवस्थापन कौशल्य जगात उल्लेखनीय असून कोविड कालावधीमध्ये बिहार निवडणुका तसेच राज्यातही विधानपरिषदेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या.

डॉ. ओक यांनी आयोगाने केलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल गौरवोद्गगार काढले तसेच पुढील काळात ऑनलाईन पद्धतीने निवडणुका होणे अशक्य नाही असे ते म्हणाले. यावेळी डॉ. निशिगंधा वाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी माहिती दिली की, ऑनलाईन मतदार नोंदणी तसेच अन्य सेवांचा मतदारांकडून प्रभावी वापर होत आहे. नुकत्याच झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नवीन साडेदहा लाख मतदारांची भर पडली असून सध्या राज्यात सुमारे 9 कोटी मतदार आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर, मतदार नोंदणीसाठी ‘एनव्हीएसपी’ पोर्टल, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी ‘सुविधा’ पोर्टल, निवडणूक खर्च ऑनलाईन भरण्याची सोय, मतदारांसाठी व्होटर पोर्टल, व्होटर हेल्पलाईन, मोबाईल ॲप, सी-व्हिजिल ॲप आदी उपलब्ध करुन दिले. आज ई-इपिक डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तसेच ‘हेलो वोटर्स’ या रेडिओ चॅनेलचीही आज सुरुवात झाली आहे. पुढील काळात निवडणूक यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी ‘ई-ट्रेनिंग’ पोर्टलही लवकरच सुरु करण्याचे नियोजन आहे, असेही सिंह म्हणाले.

यावेळी मदान यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक‍ स्वरुपात दहा नवमतदारांना ई- मतदार ओळखपत्रांचे (ई-इपिक) वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या संदेशाची ध्वनीचित्रफीत तसेच मतदार जागृती, ई-इपिकबाबतच्या ध्वनीचित्रफीती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमात राज्यातील विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते. आभारप्रदर्शन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सल्लागार दिलीप शिंदे यांनी केले.