नामिबिया देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या काही रोचक आख्यायिका

nambia
नामिबिया देशामध्ये एके काळी अस्तित्वात आलेल्या आख्यायिकांची, आजही मागील पिढीकडून पुढील पिढीशी, अनेक मौखिक कथा, प्राचीन परंपरा यांच्यामार्फत ओळख करविली जात आहे. यातील अनेक आख्यायिका अतिशय रोचक आहेत. नामिबियामधे अस्तित्वात असलेल्या अनेक आदिवासी जमाती, त्याचे धर्म, परंपरा, रूढी, आणि प्राचीन मानवी इतिहासावर या आख्यायिका आधारलेल्या आहेत. या आख्यायीकांच्या माध्यमातून या देशातील सामाजिक जीवन एके काळी कसे असावे, येथील चाली-रीती कश्या असयात याचा अंदाज आपल्याला येतो.
nambia1
नामिबियाच्या वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी लहान मोठी वर्तुळे नजरेस पडतात. ही वर्तुळे नेमकी कशी तयार झाली याबद्द्ल खात्रीशीर रित्या कोणीही सांगू शकत नाही. काही लोक या वर्तुळांना साक्षात परमेश्वराच्या पाऊलखुणा मानतात, तर अनके जमातींमध्ये एक निराळीच आख्यायिका प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार एक विशालकाय ड्रॅगन भूमीच्या खाली राहत असून, त्याच्या उष्ण श्वासोच्छ्वासामुळे भूमीवरील वनस्पती जळून त्या ठिकाणी अशी वर्तुळे निर्माण होत असल्याचे बोलले जाते.
nambia2
नामिबिया येथील ‘हेरेरो’ जमातीशी निगडीत रोचक आख्यायिका त्या जमातीचे निर्माण कसे झाले याबद्दल सांगते. या आख्यायिकेनुसार या जमातीतील मानवांचे निर्माण माकुरू आणि त्याची पत्नी कामुन्गारुंगा यांच्यामुळे झाले. हे दोघे ‘ओममबोरोमबोंगा’ नामक एका पवित्र झाडाच्या मुळांतून अवतरले असे म्हणतात. या झाडाला सामान्य भाषेमध्ये ‘लेडवूड’ म्हटले जाते. याचे खोड शिसाप्रमाणे (लेड) वजनदार असून ते पाण्यावर तरंगू शकत नसल्याने या झाडाला लेडवूड म्हटले जाते. तसेच या जमातीतील गाई-गुरे देखील याच झाडाच्या मुळातून उत्पन्न झाली असल्याची मान्यता असल्याने, या झाडाला ‘जन्मदाता’ मानून या झाडाच्या पायाशी झाडाच्या फांद्या वाहण्याची पद्धत रूढ आहे.
nambia4
नामिबियामध्ये असलेल्या ‘ख्वे’ जमातीच्या लोकांमध्ये, हत्ती एके काळी मानवच असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. म्हणूनच या जमातीमध्ये सांगितल्या जाणाऱ्या प्राचीन कथा-कहाण्यांमध्ये हत्तींना महत्वाचे स्थान आहे. तर ‘सान’ जमात ‘मान्तीस’ या शक्तीला मानीत असून, ही शक्ती सर्वत्र अस्तित्वात असल्याची यांची मान्यता आहे. या जमातीतील लोकांकडून करण्यात येणाऱ्या शिल्पकला, भित्तीचित्रे यातूनही ‘मान्तीस’चे दर्शन घडत असते.

Leave a Comment