आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना राहुल गांधींचे शांततेचे आवाहन


नवी दिल्ली – पोलीस आणि आंदोलकांमध्ये दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान मोठा संघर्ष झाला असून आंदोलकांकडून ठिकठिकाणी तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, कुठल्याही समस्येचे हिंसा हे उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचेच होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत. दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.