दिल्लीतील ट्रॅक्टर मार्च दरम्यान शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड


नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कृषि कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. पोलिसांनी याला परवानगी दिलेली असली तरीही पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड लावून रस्ते अडविले असल्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. शेतकऱ्यांनी अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला.

सध्या सोशल मीडियात दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अक्षरधामच्या आधी बॅरिकेड लावले होते. पण ट्रॅक्टरच्या मदतीने काही शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.

देशासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. एकीकडे देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषि कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. 60000 हून अधिक ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमेवर सध्या उभे ठाकले आहेत. परंतू, पोलिसांनी सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केले आहे.

केएमपी-केजीपीवर जवळपास 25 ते 30 किमीच्या रांगा दिल्लीला जाण्यासाठी लागल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यासाठी सिंघु बॉर्डर उघडली आहे. शेतकरी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला रवाना झाले होते. पण, काही ठिकाणी बॅरिकेड्स असल्याने ते हटवून काही शेतकरी पुढे जाऊ लागले आहेत.